संजय मांजरेकरचा टेनिस स्टार सानिया मिर्झाशी पंगा
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 11:25 PM (IST)
मुंबई: भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकर सध्या एक घाव दोन तुकडे करण्याच्याच मूडमध्ये दिसतो आहे. संजयनं मंगळवारी मनसेवर ताशेरे ओढले होते. तर बुधवारी सकाळी त्यानं भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाशी पंगा घेतला. सानियानं नुकतंच टेनिस महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर सलग 80 आठवडे पूर्ण केले. या यशानं आपल्याला आणखी मेहनत घेण्याची प्रेरणा दिल्याचं सानियानं ट्विट केलं होतं. संजयनं सानियाचं अभिनंदन केलं, मात्र दुहेरीतली नंबर वन असा उल्लेख केला. त्यावर साधी गोष्ट आहे, मी आता एकेरी खेळत नाही. माझंच चुकलं, सर्वांनाच साध्या गोष्टी समजत नाहीत. असं प्रत्युत्तर सानियानं दिलं. त्यानंतर संजय आणि सानियामध्ये जणू ट्विटयुद्ध सुरू झालं. अखेर संजयनं मी आता ऑफस्टम्पबाहेरचे चेंडू सोडून द्यायचं ठरवलंय असं म्हणून वाद थांबवला.