लखनऊ : उत्तर प्रदेशचं राजकारण संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय आहे. कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मिशन 2019 रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याचे चिन्ह आहेत. तसे संकेतही मिळाले आहेत. मात्र समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी कोणत्याही प्रकारची महायुती करण्याची शक्यता फेटाळली आहे.
समाजवादी पार्टी कुणाशीही महायुती करणार नाही. आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे, असं मुलायम सिंह यादव यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे कालच सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी येत्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते.
मायावतींचा युतीसाठी प्रस्ताव
बसपा अध्यक्ष मायावती यांनी दोन दिवसांपूर्वीच युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. देशातील लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि ईव्हीएमच्या घोळाविरोधात केल्या जात असणाऱ्या आंदोलनात भाजपचे विरोधी पक्ष आमच्यासोबत आल्यास त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासा आम्हाला काही हरकत नसेल, असं मायावती म्हणाल्या होत्या.
मायावतींनी भाजपला रोखण्यासाठी इतर विरोधीपक्षांना एकत्र येण्याचे संकेत दिले होते. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी अखिलेश यादव यांनीही भाजपला रोखण्यासाठी मायावतींसोबत जाण्यास हरकत नसेल, असं म्हटलं होतं.
विधानसभा निवडणुकीत सपा, काँग्रेस आणि बसपा मिळून 73 जागा
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला 403 पैकी 325 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस-सपा आणि बसपा या तिन्ही पक्षांना मिळून 73 जागा मिळाल्या आहेत. मात्र मताधिक्याच्या बाबतीत सपा आणि बसपाने बाजी मारली आहे. दोन्हीही पक्षांना प्रत्येकी 22 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसला 6 टक्के मताधिक्य मिळालं आहे.
देशातील सर्वात मोठं राज्य म्हणून ओळख असणाऱ्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने 80 पैकी 73 जागांवर विजय मिळाला होता. तर बसपा आणि सपाला केवळ प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.