Sahara India Refund Portal : सहारा समूहाचे सुब्रतो रॉय...लाईमलाईट ते तिहार जेल असा प्रवास करणारे हे वादग्रस्त व्यक्तिमत्व. याच समूहाच्या संस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अखेर दोन दशकाच्या प्रतीक्षेनंतर पैसे परत मिळण्याचा मार्ग उपलब्ध झालाय.
चिट फंड घोटाळ्याच्या बातम्या तर अनेकदा होतात. पण या घोटाळ्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार अशी बातमी दुर्मिळच. पण सहारा समूहाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना आता त्यांचे पैसे परत मिळायला सुरुवात झालीय. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यासाठी एका विशेष पोर्टलचं उद्घाटन नुकतंच केलंय. निकषांमध्ये बसणाऱ्या गुंतवणूकदारांना 45 दिवसांत त्यांची रक्कम परत मिळेल असा दावा सरकारनं केलाय.
सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमधे पैसे गुंतवणाऱ्या लोकांसाठी हा दिलासा असेल. पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपयापर्यंतची रक्कम परत मिळेल. तर अधिक पैसे गुंतवणाऱ्या लोकांना नंतर 50 हजार रुपयापर्यंतची रक्कम मिळेल अशी योजना आहे.
सन 2005 च्या आसपास यूपी, बिहारमधल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये या योजनेची धूम होती. गोरगरीबांनी आपली मेहनतीची कमाई यात लावली. चांगले रिटर्न येतील अशी आशा त्यांना दाखवली गेली. पण नंतर काही वर्षातच कंपनीने हे पैसे परत करायला मनाई केली. 2009 मध्ये कंपनीचा आयपीओ आला त्यानंतर तर पोलखोल वाढत गेली. 24 हजार कोटी रुपयांची माया सहारानं गोळा केल्याचं उघड झालं. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास सेबीनं सांगितलं. पण कंपनीनं तेव्हा ऐकलं नाही. केस कोर्टात गेली.
सहारा समूहातले पैसे नक्की कसे आणि कुणाला मिळणार?
हमारा इंडिया को. ऑप. सोसायटी कोलकाता. सहारा क्रेडिट सोसायटी लखनौ, सहारायन मल्टिपर्पज सोसायटी भोपाळ, स्टार मल्टीपरपज सोसायटी हैदराबाद या चार संस्थांमध्ये पैसे गुंतवणूकदारांसाठी ही ठेव परतीची योजना आहे. 22 मार्च 2022 या तारखेआधी ज्यांची रक्कम प्रलंबित आहे, तेच गुंतवणूकदार यात लाभार्थी असतील.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2012 मध्येच सेबी सहारा फंड तयार करण्यात आला होता. त्याच फंडातून 5 हजार कोटी रुपये काढून गुंतवणूकदारांमध्ये वाटले जाणार आहेत. यासाठी आधार कार्ड आणि सभासद नंबर अशा काही बेसिक गोष्टीची पूर्तता केल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर कुठल्याही एजंटविना 45 दिवसांच्या आत हे पैसे खात्यावर जमा होतील असा सरकारचा दावा आहे.
आता इतक्या वर्षानंतर सहाराच्या गुंतवणुकदरांना दिलासा मिळतोय. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. कोर्टाच्या आदेशानं स्थापन झालेल्या फंडातले काही पैसै परत करण्यासाठी केंद्रानं परवानगी मागितली होती. 28 मार्च रोजी तशी परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली. त्यावेळी दहा महिन्यांत हे पैसे गुंतवणूकदारांना परत केले जातील असं वचन केंद्रानं कोर्टात दिलं होतं. त्याचनुसार तातडीनं ही प्रक्रिया राबवण्यात आली.
नव्वदीच्या दशकात सहारा हे नाव अगदी जिकडे तिकडे झळकत होतं. अगदी भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरही सहाराचं नाव होतं. पण गोरगरीबांच्या मेहनतीवर माया जमवणाऱ्या सुब्रतो रॉय यांची उतरती दशाही लवकरच सुरु झाली. त्यांना तुरुंगावासही भोगावा लागला. आता तर त्यांच्या पंचाहत्तरीचं निमित्त साधून त्यांच्या आयुष्यावर चित्रपटही बनतोय. पण या सगळ्यात चिट फंडच्या नादानं अनेक सामान्यांची मात्र आयुष्यं बरबाद झालीयत. सरकारची ही परतफेड योजना केवळ जखमेवरची मलमपट्टीच आहे. जोपर्यंत अशा स्कीमच्या मुळावर घाव बसत नाहीत तोपर्यंत त्याचं पेव परत परत फुटताना दिसतं.
ही बातमी वाचा: