नवी दिल्ली : यूपी निवडणुकांच्या (Uttar Pradesh Election) पार्श्वभूमीवर काल काँग्रेसच्या (Congress) जितेन प्रसाद (Jiten Prasad) या युवा नेत्याला भाजपनं (BJP) आपल्या जाळ्यात ओढलं. या घडामोडींचे परिणाम काँग्रेसमध्ये अगदी राजस्थानपर्यंत जाणवत आहेत. कारण सचिन पायलट (Sachin Pilot) यांची घुसमट एका वर्षाच्या आत पुन्हा बाहेर आली आहे.ते जाहीरपणेही यावर बोलत आहेत. 


आधी ज्योतिरादित्य शिंदे, काल जितेन प्रसाद. आता काँग्रेसमधून पुढचा नंबर कुणाचा? साहजिकच सगळ्यांच्या नजरा राजस्थानकडे वळल्यात. जिथे सचिन पायलट यांच्या मनातली खदखद अजूनही शांत झालेली नाहीय. मागच्या वर्षी त्यांनी आपल्या असंतोषाची एक झलक दाखवली खरी, पण हे बंड शांत करण्यात हायकमांडला यश आलं. पण 10 महिन्यानंतरही काहीच कारवाई झालेली नाही असं म्हणत सचिन पायलट पुन्हा जाहीर नाराजी व्यक्त करु लागलेत. 


आता दहा महिने उलटून गेलेत.राजस्थानबाबत नेमलेल्या समितीकडून मला न्याय मिळेल असं सांगितलं गेलं होतं. पण हे सगळे मुद्दे अजूनही दुर्लक्षित आहेत. ज्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी कष्ट घेतले त्यांना बाजूला फेकल्याची भावना आहे. 


राजस्थानमधल्या या घडामोडींवर भाजपही चांगलंच लक्ष ठेवून आहे. त्याचमुळे भाजपच्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्यावर पुन्हा जाळं टाकायला सुरुवात केलीय. राजस्थान विधानसभेचा निम्मा कार्यकाल आता संपत आलाय. त्यामुळे आता न्याय मिळणार नाही तर कधी हा पायलट गटाचा प्रश्न आहे 


ज्योतिरादित्य, जितेन प्रसाद यांच्यापेक्षा पायलट यांची केस तशी वेगळी आहे. कारण पायलट यांना प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ही दोन्ही पदं काँग्रेसनं दिली होती. भाजपमध्ये जाऊन याच्यापेक्षा कुठलं मोठं पद मिळणार हा विचार त्यांना करावा लागेल. कारण भाजपच्या वसुंधरा राजे या सचिन पायलट यांना पक्षात घ्यायला आजिबातच उत्सुक नाहीत.


राजस्थानमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार हा पायलट यांच्या नाराजीवरचा उपाय ठरु शकतो. पण त्यात पायलट गटाला भाव द्यायला अशोक गहलोत किती तयार होतात हा मुद्दा आहे. कारण शेवटी आमदारांची संख्या गहलोत यांच्या बाजूनं आहे. शिवाय पायलट यांच्यासाठी अजून एक गोष्ट नुकसानकारक ठरली. ती म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन.जी समिती पायलट यांच्या मागण्यांवर विचार करणार होती तिचे अध्यक्षच अहमद पटेल होते.त्यांच्या निधनानंतर ही बैठकच झाली नाही. 


11 जूनला राजेश पायलट यांची पुण्यतिथी असते. मागच्या वर्षी याच दिवसाच्या निमित्तानं सचिन पायलट यांची नाराजी बाहेर पडली होती..आताही जितेन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाची वेळ साधत त्यांचा गट आक्रमक झालाय...गेल्या दोन दिवसांत पायलट यांच्या आमदारांच्या बैठकांचं सत्र वाढत चाललंय..त्यामुळे ही केवळ दबावाची रणनीती ठरते की पायलट एका धाडसी निर्णयासाठी टेक ऑफ करणार हे पाहावं लागेल.