Sabarmati-Agra Train Derail: राजस्थान : राजस्थानच्या (Rajasthan) अजमेरमध्ये (Ajmer) एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये धडक झाली, त्यानंतर गोंधळ उडाला. अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेस (Sabarmati Agra Superfast Train) आणि मालगाडी यांच्यात ही टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, साबरमती आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. अजमेरमधील मदार स्टेशनजवळ रात्री 1.10 च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्यानं हा भीषण अपघात झाला.


नेमकं काय घडलं? 


राजस्थानमधील अजमेर येथे सोमवारी (18 मार्च) पहाटे साबरमती-आग्रा सुपरफास्टचे चार डबे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकावर दुपारी 1.04 वाजता साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्यानं हा भीषण अपघात झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटनं ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेकही लावला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या आणि अपघात झाला. 






अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस मालगाडीला धडकल्यानं इंजिनसह जनरल डब्यातील चार डबे रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत जीवीतहानी झालेली नाही. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी अजमेर स्थानकात नेण्यात आलं आहे. झोपेत असताना अचानक मोठा आवाज आल्याचं प्रवाशांनी सांगितलं. यानंतर ट्रेन रुळावरून घसरली.


रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF), गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) यांच्यासह अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. रुळावरून घसरलेले डबे आणि इंजिन पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतरचा व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये रुळावरून घसरलेल्या डब्यांची तपासणी सुरू असल्याचं दिसून येत आहे. या धडकेमुळे रेल्वेचे काही खांबही रेल्वेच्या वर पडले असून ते गॅस कटरच्या सहाय्यानं कापले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 


या घटनेनंतर प्रवाशांनी नेमकं काय झालं ते सांगितलं. ते म्हणाले की, "ट्रेन अजमेर रेल्वे स्थानकातून रात्री 12:55 च्या सुमारास निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना जबर धक्का बसला आणि सीटवर झोपलेली मुलं, महिला आणि वृद्ध लोक सीटवरून खाली पडलं. अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्यानं प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली."