PM Modi Volodymyr Zelenskyy News : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध अद्याप कायम आहे. या संघर्षाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी झेलेंस्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत रशियासोबत युद्ध लवकर संपवण्याची आणि चर्चा करुन मार्ग काढण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदी यांनी शांततेनं मार्ग काढण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.


पीएम मोदी म्हणाले की, संघर्षावर केवळ युद्धाच्या मार्गानेच तोडगा निघू शकतो असं नाही. या संघर्षावर शांततेनं तोडगा काढण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यास भारत तयार आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.


पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की यांच्यासोबत फोनवरून केलेल्या चर्चेत संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व राज्यांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्त्वाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. युद्ध लवकरात लवकर थांबवण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. शिवाय चर्चेतून मार्ग काढण्याचंही आवाहन केलं आहे.






काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


पीएमओने पंतप्रधान मोदी यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, युद्धात अणु ऊर्जेचा वापर झाल्यास फार वाईट परिणाम होईल. पुतिन यांनी युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती.