Russia Ukraine War : युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने केल्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळाली नसल्याचे परराष्ट्र मंत्र्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले. एका निवदेनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. युक्रेन सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
रशियाच्या संरक्षण खात्याने केलेल्या दाव्यानुसार, युक्रेनच्या सुरक्षा जवानांकडून भारतीय विद्यार्थ्यांना खारकीव्ह सोडण्यास मज्जाव केला जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवून त्यांचा वापर मानवी ढाल म्हणून करण्यात येत असल्याचा दावा रशियाने केला. रशियाच्या या दाव्यानंतर देशात आणखी चिंता व्यक्त होऊ लागली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, युक्रेनमधील दूतावास भारतीयांच्या संपर्कात आहे. युक्रेनमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने भारतीय विद्यार्थ्यांनी खारकीव्ह सोडले आहे. खारकीव्ह आणि इतर जवळपासच्या शहरातून युक्रेनच्या पश्चिम भागातील सीमेवर सोडण्यासाठी युक्रेनच्या अधिकाऱ्यांना विनंती केली असल्याचेही त्यांनी म्हटले.
भारतीय परराष्ट्र खाते रशिया, रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोव्हा या देशातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले. मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिकांची युक्रेनमधून सुटका करण्यात आली आहे. युक्रेनमधून भारतीयांना आपल्या देशात प्रवेश देऊन, त्यांना मायदेशी परतण्यासाठी मदत करणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत, असेही बागची यांनी म्हटले.
रशियाने काय म्हटले ?
युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप रशियाने केला आहे. खारकीव्हमधून या विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर पडू देत नसल्याचे भारतातील रशियन दूतावासाने म्हटले. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी रशियन सैन्य मदत करणार असल्याचे रशियन दूतवासाने म्हटले आहे. मागील सात दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
भारतातील रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती माध्यमांनी दिली. या माहितीनुसार, युक्रेनमधील खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोद येथे जायचे आहे. मात्र, युक्रेनकडून या विद्यार्थ्यांना अटकाव करण्यात आला असून ओलीस ठेवले आहे. युक्रेनच्या सुरक्षा जवानांकडून या विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत रशियात जाण्यापासून अडवले जात आहे. या प्रकारासाठी युक्रेनचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.