Uttarakhand Accident News  : उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-ट्रॅव्हलर अलकनंदा नदीच्या पात्रात कोसळला. शनिवारी झालेल्या या अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. रुद्रप्रयाग येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 


रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे नियमंत्रण सुटल्यामुळे अचानक टेम्पो नियंत्रणाबाहेर गेला आणि रस्त्यापासून 250 मीटर खाली अलकनंदा नदीत  पडले. या अपघातात 10 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातमधील जखमीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मृतांपैकी तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांमध्ये चालक करण सिंह याचाही समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेले पर्यटक नोएडा, मथुरा, उत्तर प्रदेशातील झाशी, उत्तराखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा येथील हल्दवानी येथील रहिवासी होते. सर्व पर्यटक चोपटा येथे फिरण्यासाठी जात होते.


अपघातात गंभीर जखमी झालेल्या सात जणांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या आदेशानुसार हवाई अॅम्ब्युलन्सद्वारे ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचारासांसाठी नेहण्यात आले. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच गंभीर जखमींना प्रत्येकी 40 हजार तर किरकोळ जखमी असलेल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत  देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.






 
शनिवारी सकाळी 11.30 वाजता अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी सौरभ गहरवार, पोलीस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव आणि मदत कार्यावर देखरेख केली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिली.