जयपूर: 'देशातून सगळ्या प्रकारच्या आरक्षणाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे', असं स्फोटक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्यांनी केलं आहे. ते आज जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये बोलत होते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमोहन वैद्यांनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.


'कोणत्याही राष्ट्रामधील असणारा भेदभाव संपला पाहिजे. सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे आरक्षणाबाबत विचार करणं गरजेचं आहे. तसेच एका विशिष्ट वेळपर्यंत यावर निर्णय घेणं गरजेचं आहे.' असंही मनमोहन वैद्य म्हणाले.

संघ कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाच्या बाजूचा नसल्याचं वैद्य यांनी म्हटलं आहे. बिहार निवडणुकीआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या फेरविचाराची भूमिका मांडली होती. त्याचं नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी जोरदार भांडवल केलं होतं. परिणामी भाजपला बिहार गमवावं लागलं होतं.

आता उत्तर प्रदेशातही विरोधक वैद्य यांच्या वक्तव्याचं भांडवल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.