Rahul Gandhi On RSS :  लंडन दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. आरएसएस ही फॅसिस्ट संघटना असून भारतातील लोकशाही मोडण्यासाठी तयार झालेली गुप्त संघटना असल्याचे गांधी यांनी म्हटले. लंडन येथील चॅथम हाऊस येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे भाष्य केले. 


चॅथम हाऊस ही लंडन येथील एक थिंक टँक संस्था असून यातील संवाद, चर्चात्मक कार्यक्रम बंदिस्त असतात. मात्र, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.  


आरएसएस ही गुप्त संघटना असून मुस्लिम ब्रदरहूड सारखे या संघटनेचे काम चालते. लोकशाहीचा वापर करून सत्तेत येणे आणि हाती सत्ता आल्यावर लोकशाहीच नष्ट करण्याचे काम संघ करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. भारतातील विविध संस्था काबीज करण्यात किती यशस्वी झाले आहेत, याचे आश्चर्य वाटत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, संसद, निवडणूक आयोग आदी सर्व संस्था दबावाखाली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. 


राहुल यांनी ब्रिटनच्या संसदेतील खासदार, शैक्षणिक, पत्रकार आणि समुदायाच्या नेत्यांशीही संवाद साधला. लेबर पार्टीचे शॅडो फॉरेन सेक्रेटरी डेव्हिड लॅमी यांच्यासोबतही त्यांनी संवाद साधला.


राहुल गांधी यांनी म्हटले की, आरएसएस-भाजपने देशातील स्वायत्त संस्था उद्धवस्त केल्याने भारत जोडो यात्रा काढावी लागली. मी 2004 मध्ये राजकारणात आलो तेव्हा भारतात लोकशाहीची लढत राजकीय पक्षांमध्ये असायची. याचे स्वरूप पूर्णपणे बदलेल याची मी त्यावेळी कल्पनाही केली नव्हती. ते बदलण्याचे कारण म्हणजे RSS नावाच्या एका संघटनेने - मूलत: भारतातील सर्व संस्थांवर ताबा मिळवला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 


राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर टीका केली. प्रत्येक देशाला आपला शेजारचा देश चांगला असावा असे वाटते. भारत-पाकिस्तान संबंध हे पाकिस्तानवर अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानकडून भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे भारतासोबत त्यांचे संबंध चांगले असू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 
 
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही राहुल गांधी यांनी भाष्य केले. काँग्रेस पक्षात झालेल्या निवडणुकीत खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाली. भाजपशी लढण्यासाठी आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत आणि मला खर्गे यांच्या क्षमतांवर आणि त्यांच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. अनेक वर्षे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ते एक अत्यंत सक्षम आणि गतिमान व्यक्ती असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.