उत्तर प्रदेश : आग्र्यातील संदीप तिवारी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात अचानक 99 कोटी, 99 लाख 91 हजार रुपये म्हणजेच जवळपास 100 कोटी रुपये जमा झाले आहेत. अचानक एवढी पैसे जमा झाल्याने संदीप तिवारीसह कुटुंब घाबरलं असून त्यांना रात्रभर नीट झोपही लागली नाही. तर बँक अधिकारीही चक्रावले आहेत.
आग्र्याच्या मंडी समितीजवळ असलेल्या सुमीतनगरमध्ये राहाणारा संदीप तिवारी रुद्रपूरमध्ये एका कंपनीत कामगार आहे. संदीपने सुमारे सहा वर्षांपूर्वी बिचपुरीमधून पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केला होता. त्यावेळी त्याने एसबीआयच्या बिचपुरी शाखेत खातं उघडलं होतं.
संदीप 24 नोव्हेंबर रोजी घरी आला. मंगळवारी संध्याकाळी तो ट्रान्सयमुना कॉलनीमधील एसबीआयच्या एटीएमध्ये गेला तर तिथे रोकड नव्हती. पण बॅलन्स चेक केल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अकाऊंटमध्ये 99 कोटी, 99 लाख 91 हजार 735 रुपये असल्याची स्लिप बाहेर आली.
ही माहिती चुकीची असल्याचं वाटल्याने तो दुसऱ्या एटीएमध्ये गेला. तिथे बॅलन्स चेक केल्यावर तेवढीच रक्कम असल्याचं दिसलं.
संदीपने कुटुंबीयांना ही बाब सांगितल्यानंतर तेही घाबरले. त्यांनी शेजाऱ्यांनाही याची माहिती दिली. पुन्हा एसबीआयच्या एटीएममध्ये बॅलन्स चेक करण्यासाठी गेले, पण बॅलन्स तेवढाच होता. संदीपच्या माहितीनुसार, त्याच्या खात्यात सुमारे 8 हजार रुपये असायला हवे होते. मात्र एवढे पैसे कसे काय जमा झाले, हे त्याला समजलेलं नाही.
यानंतर संदीपने बँकेत धाव घेत तक्रार केली. पैसे नेमके कोणी जमा केले याबाबत चौकशी सुरु आहे.
नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांच्या खात्यावर असे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरही काही रक्कम जमा झाली, तर त्वरीत पोलीस आणि बँकेशी संपर्क साधा.