नवी दिल्ली : बनावट नोटांचं रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करणं, हा खरंतर नोटाबंदीचा उद्देश आहे. म्हणूनच केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाला केवळ 19 दिवसच झाले असताना, 500 आणि 2000 च्या बनावट नोटा छापण्यासही सुरुवात झाली आहे. हैदराबाद पोलिसांनी जवळपास 2 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.


या प्रकरणात पोलिसांनी एका टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडे 2000 च्या नोटांसह 100, 50 आणि 10 रुपयांच्या बनावट नोटाही सापडल्या. दोन कलर फोटो कॉपी मशिनही जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीतले दोघेजण अद्यापही फरार आहेत.


हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार, 2000 ची नोट नवी असल्याने सामान्य लोकांना खरी नोट किंवा बनावट नोटांमधील फरक समजण्यास अवघड जात आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा बनावट नोटा तयार करणारे उचलत आहेत.

हैदराबादमध्ये 2000 च्या बनावट नोटा पकडल्यानंतर, मुंबईतही 500 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं. कल्याणमधील दुकानात 500 ची बनावट नोट ग्राहकाकडून मिळाल्याचे वृत्त आहे. कल्याणमधील बनावट नोटप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं आणि बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त व्हावं, या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयानंतर उघडकीस आलेल्या बनावट नोटांच्या घटनांवरुन मूळ उद्देश साध्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.