नवी दिल्ली : कांग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा लवकरच सक्रीय राजकारणात पहायला मिळू शकतात. वाड्रा यांनी एका फेसबुक पोस्टच्या माधमातून राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर एबीपी न्यूजने वाड्रा यांच्याशी बातचीत केली. यावेळी वाड्रा म्हणाले की, मी बदल घडवू शकतो, बदल घडवण्यासाठी मी राजकारणात येऊ शकतो.


वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मनी लाँडरिंगच्या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे. याप्रकरणी माझी सध्या चौकशी सुरु आहे. ही चौकशी संपल्यानंतर मी देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यातही प्रामुख्याने उत्तर प्रदेशवासियांसाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे."

वाड्रा म्हणाले आहेत की, "गेल्या काही वर्षांपासून देशातील सरकार मला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचत आहे. परंतु त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. हे आरोप खोटे असल्याचे एव्हाना लोकांना समजले आहे. देशातील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे. अनेकांचा मला पाठिंबादेखील आहे. मी या लोकांचा ऋणी आहे."

फेसबुक पोस्टच्या शेवटी वाड्रा म्हणतात की, "मी मदर तेरेसा यांच्या विचारांनी प्रेरित झालो आहे. मी विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांना भेटी द्यायचो, अनाथ आश्रमांना भेटी द्यायचो, मंदिराबाहेर भिकाऱ्यांना अन्नदान करायचो यादरम्यान मी खूप काही शिकलो आहे.

अंमलबजावणी संचलनालय (ईडी)माझी चौकशी करत आहे. दिवसातून आठ-आठ तास मी अधिकाऱ्यांसमोर बसून त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत असतो. यामधून मी खूप काही शिकत आहे."