रॉबर्ट वढेरा यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक सविस्तर पोस्ट लिहून केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली. 'तुम्ही जे पेरता तेच उगवतं. ज्यांनी 2010पासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले त्यांच्यावरच आज भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. ते देखील त्यांच्याच लोकांकडून. तसेच त्यांच्याकडे पुरावेही असल्याचं ती लोकं सांगत आहेत. मी केजरीवाल यांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की, या प्रकरणी त्यांच्यावर कोणाताही डाग लागणार नाही. कारण की, ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे किमान त्यांचा विश्वास तरी ते तोडणार नाहीत.' असं वढेरा म्हणाले.
2012 साली केजरीवाल यांनी वढेरांवर केले होते आरोप:
2012 साली अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर अनेक आरोप केले होते. 'एका रिअल इस्टेट कंपनीनं वढेरा यांना 65 कोटींचं कर्ज दिलं. त्यासाठी कोणतीही गोष्ट तारण ठेवण्यात आलेली नव्हती. तसेच यासाठी कोणतंही व्याज आकारण्यात आलेलं नाही.' असा केजरीवाल यांनी आरोप केला होता.
कपिल मिश्रांचे केजरीवाल यांच्यावर धक्कादायक आरोप:
अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे.
50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे.
जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात.
भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या प्रतिमेला कपिल मिश्रांच्या आरोपाने धक्का लागला आहे. एकूणच आम आदमी पक्षातला अंतर्गत कलह वारंवार समोर येताना दिसत आहे.
संबंधित बातम्या:
केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा
कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र