नवी दिल्ली : रस्ते अपघातात मरणाऱ्यांची विमा रक्कम त्यांच्या सद्य कमाईनुसार निश्चित होणार नाही. मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत असता तर भविष्यात त्याची कमाई किती असती हे आता विमा देताना पाहिलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिला.


विमा रक्कम निश्चित करण्याची सध्याची व्यवस्था बरोबर नाही. वाहन कायद्यामध्ये न्यायसंगत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मृत्यू होणाऱ्या व्यक्तीची सध्याची कमाई पाहून विमा निश्चित करणं हे न्यायसंगत नाही होऊ शकत, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं.

भविष्यातील कमाई निश्चित करण्याची पद्धत कशी असेल?

न्यायाधीशांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींची भविष्यातील कमाई निश्चित करण्याची पद्धतही निर्णयामध्ये दिली आहे.

  • अपघातात मृत्यू होणारा व्यक्ती कायमस्वरुपी नोकरीवर असून त्याचं वय 40 पेक्षा कमी असेल, तर त्याचं उत्पन्न सध्याच्या कमाईपेक्षा 50 टक्के जास्तच्या आधारावर निश्चित केलं जाईल. वय 40 ते 50 च्या दरम्यान असेल तर रक्कम 30 टक्के वाढवली जाईल. 50 ते 60 वय असेल तर भविष्यातील उत्पन्न 15 टक्के वाढवलं जाईल.

  • मृत्यू होणारा व्यक्ती व्यापार किंवा खाजगी क्षेत्रात काम करत असेल तर, त्याच्या भविष्यातील कमाईच्या आधारावर विमा रक्कम निश्चित होईल. वय 40 पेक्षा कमी असल्यास 40 टक्के, 40 ते 50 वय असल्यास 25 टक्के आणि 50 ते 60 वय असल्यास उत्पन्न 10 टक्क्यांनी जास्त ग्रहित धरलं जाईल.