श्रीनगर : ज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला.

इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुखारी हे लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

यामध्ये शुजात बुखारी यांच्यासह त्यांचा पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) मृत्युमुखी पडला, तर एक पोलिस आणि सामान्य नागरिक जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. 'ईदच्या काळात दहशतीने डोकं वर काढलं आहे. या हिंसक घटनेचा तीव्र निषेध. बुखारी यांच्या मृतात्म्याला शांती लाभो.' असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.


2000 साली शुजात बुखारींवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं होतं. काश्मिर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते पुढाकार घेत होते.