नवी दिल्ली : नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे उद्या (मंगळवारी) निकाल लागतील. उद्या सकाळपासून त्याची मतमोजणी सुरु होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांमध्ये निवडणुकींच्या रिंगणात उभे राहिलेल्या 8 हजार 500 उमेदवारांचे भविष्य 74 हजार ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स) मशिन्समध्ये दडलं आहे. या ईव्हीएम मशिन्स सध्या 670 अतिसुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.


मध्यप्रदेशमध्ये 230 विधानसभा जागांवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत 2907 उमेदवार उभे राहिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी 74 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

राजस्थानमध्ये 199 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टीसह विविध लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार मिळून तब्बल 2274 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तसेच भाजपशासित छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. त्यासोबत तेलंगणा आणि मिझोरम राज्याच्या निवडणुकांचादेखील उद्या फैसला होणार आहे.