नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. यानंतर काही स्पेशल ट्रेन्स सुरु करत नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र रेल्वेची व्यवस्था सामान्य होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे मंत्रालयाने सर्व ट्रेन्स 12 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. यापूर्वी 30 जून पर्यंत ट्रेन्स रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र रेल्वेकडून सुरु असलेल्या 100 मार्गांवरील स्पेशल ट्रेन्स मात्र सध्या सुरुच राहतील.


दरम्यान 1 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान रेल्वेच्या रेग्युलर वेळापत्रकानुसारच्या ज्या ट्रेन सध्या सुरु नाहीयत त्यांची तिकीटे रद्द करण्यात करण्यात आली आहेत. या रद्द केलेल्या तिकिटांचा संपूर्ण रिफंड प्रवाशांना मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये 14 एप्रिलपर्यंत बुक झालेली तिकीटे रद्द करण्यात आली आहेत. सध्या सुरु असलेल्या स्पेशल ट्रेनपैकी कुठलंही तिकीट रद्द नाही. स्पेशल ट्रेन चालूच राहणार आहेत. शिवाय 12 ऑगस्टपर्यंत अधिक ट्रेन सुरुही होऊ शकतात. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे पूर्वपदावर यायला अजून वेळ लागणार असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

रद्द तिकिटांचा पूर्ण रिफंड मिळणार

रेलवे बोर्डाने गुरुवार, 25 जून रोजी घोषित केलं की  1 जुलैपासून सामान्य वेळापत्रकाच्या सर्व पॅसेंजर, मेल/एक्सप्रेस आणि सबअर्बन सेवा 12 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. या काळात बुक केलेली सर्व तिकिटं रद्द करण्यात आली आहेत. या रद्द तिकिटांचा संपूर्ण रिफंड प्रवाशांना दिला जाणार आहे.

प्रवाशी आपलं तिकिट दाखवून तिकिट काऊंटरवरुन आपला रिफंड घेऊ शकतात. ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या खात्यात रिफंड जमा होणार आहे. हा रिफंड  प्रवाशी आपल्या प्रवासाच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत घेऊ शकतात, असं देखील रेल्वे बोर्डाने सांगितले आहे.

स्पेशल ट्रेन्स सुरुच राहणार 

IRCTC कडून जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, मागील महिन्यात आणि  1 जूनपासून सुरु केलेल्या विशेष राजधानी आणि अन्य विशेष एक्सप्रेस-मेल ट्रेन्स सुरुच राहणार आहेत. आधी आखलेल्या वेळापत्रकानुसार या ट्रेन्स चालणार आहेत.