CM Amarinder Singh Resigns: पंजाब काँग्रेसमधलं भांडण नवज्योत सिद्धु यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर मिटलंय असं वाटत होतं. असं असतानाच गेल्या 24 तासांत अशाकाही घडामोडी घडल्या की ज्यामुळे कॅप्टन अमरिंदर यांना राजीनामा द्यावा लागला. असं काय झालं की ज्यामुळे अमरिंदर यांची खुर्ची गेली. जाणून घेऊया अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याची कारणे.


1. प्रमुख विरोधकांना सॉफ्ट कॉर्नर


गुरु ग्रंथ साहिब जळीतकांडात झालेलं फायरिंग असो की डेरा सच्चा सौदा प्रकरण या प्रकरणांमध्ये पंजाब सरकारनं कणखरपणे बाजू न मांडल्याचा आरोप. कॅप्टन अमरिंदर हे बादल यांना सॉफ्ट कॉर्नर देत असल्यानंच त्यांनी या प्रकरणाचा तपास नीट होऊ दिला नाही असा आरोप कायम सिद्धू करत राहिले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणातून पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल हे सहीसलामत सुटत राहिले. 


2. ड्रग माफियांचा पर्दाफाश करण्यात अपयश


2017 च्या निवडणुकीत ज्या प्रमुख आश्वासनांवर काँग्रेसनं सत्ता मिळवली त्यापैकी हे एक. अगदी पवित्र ग्रंथाची शपथ घेत त्यावेळी अमरिंदर यांनी पंजाबमधलं ड्रग रॅकेट मोडून काढू असं आश्वासन दिलं होतं. पण गेल्या पाच वर्षात त्याबदद्ल कुठलीच कठोर कारवाई झाली नाही. या ड्रग रॅकेटमध्ये त्यांचे अनेक राजकीय विरोधकही होते. त्यांना इंगा दाखवण्यात अमरिंदर कमी पडले अशी टीका झाली.


3.  आमदारांचा पाठिंबा घटत गेला 


एकूण 117 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसला 2017 मध्ये 77 जागांवर विजय मिळाला. पण गेल्या काही दिवसांत अनेक आमदार कॅप्टन अमरिंदर यांच्या विरोधात होत गेले. काल जवळपास 45 आमदारांनी बैठक घेऊन नेतृत्व बदलावर चर्चा व्हावी अशी मागणी केली. 77 पैकी 44 हा जवळपास बहुमताचाच आकडा. त्यामुळेही हायकमांडवर पंजाबमध्ये अमरिंदर यांना हटवण्याबाबतचा दबाव वाढत गेला. 


CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा


4. प्रशासनावर मदार, मुख्यमंत्री आमदारांना भेटेनात
   
गेल्या पाच वर्षात अमरिंदर यांनी केलेल्या नियुक्त्या पाहता त्यांनी कारभारात ब्युरोक्रसीवर अधिक विश्वास आणि आपल्या राजकीय सहकाऱ्यांना डावलल्याचं दिसलं. गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांचा आमदारांशी थेट संपर्कही कमी झाला होता. अनेक आमदारांनी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची तक्रार केली होतीच. 


5. काही बाहेरच्या संस्थांचा निवडणुकीबाबतचा सर्व्हे
   
पंजाबबाबत जे सर्वे पक्षाला येत होते, त्यात अनेक सर्व्हे हे अमरिंदर यांच्या नेतृ्त्वात पुन्हा निवडणूक अवघड असल्याचंच दाखवत होते. अमरिंदर यांचं वाढतं वय आणि आमदारांमधली घटती लोकप्रियता यामुळे त्यांची पकड कमी झाल्याचंही जाणवत होतं. याच पार्श्वभूमीवर हायकमांडला त्यांच्या पर्यायाचा शोध गरजेचा बनला होता. 


6. काही ताजे वाद
    
शेतकरी आंदोलनाबद्दल काँग्रेसनं सहानुभूतीची भूमिका ठेवली आहे. पण मागच्या आठवड्यात अमरिंदर यांनी आंदोलकांनी पंजाबमधून निघून जावं अशा पद्धतीचं विधान केलं. जालियानवाला बाग हत्याकांडाचं स्मारक ज्या पद्धतीनं सजवण्यात आलंय त्यावर राहुल गांधींनी थेट मोदींवर टीका केली होती. एखाद्या हत्याकांडाच्या स्मारकाला अशी रोषणाई करण्यात यावी का हा त्यांचा सवाल होता. पण कॅप्टन अमरिंदर पक्षाच्या बाजूनं बोलण्याऐवजी मोदींची भलामण करत राहिले. अशा सजावटीत आपल्याला काही गैर वाटत नाही, असं त्यांचं विधान दिल्ली हायकमांडचा संताप वाढवणारं ठरलं.