भोपाळ (मध्य प्रदेश) : अवकाळी पाऊस किंवा गारपिटीच्या समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्याने अजब सल्ला दिला आहे. “जर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करायचा असेल, तर हनुमान चालिसा हाच एकमेव मार्ग आहे.”, असे भाजपचे नेते रमेश सक्सेना यांनी म्हटले आहे.   


रमेश सक्सेना पुढे म्हणाले, “सर्व गावातील शेतकऱ्यांनी रोज एक तास सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट किंवा कोणतेही नैसर्गिक संकट येणार नाही, असा माझा दावा आहे."

विशेष म्हणजे, भाजप नेत्याच्या या अजब सल्ल्याचं मध्य प्रदेशचे कृषिराज्य मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनीही समर्थन केले आहे. कृषिराज्य मंत्री म्हणाले, “नैसर्गिक आपत्तींना माणूस जबाबदार नाही. हनुमान चालिसा वाचायलाच हवी. कारण हनुमान संकटमोचक आहेत. त्यामुळे सक्सेना यांनी काही चुकीचे म्हटले नाही.”

भाजप नेते आणि कृषिराज्य मंत्री या दोघांच्या अजब सल्ल्यावर काँग्रेस प्रवक्यानेही अजब विधान केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, “रमेश सक्सेना भाजपचे धडाकेबाज नेते आहेत. त्यांच्या सल्ल्यामुळे देवांमध्येच आपापसात वाद होईल. सक्सेना म्हणतायेत, हनुमान चालिसा वाचावी, मात्र मध्य प्रदेशात तर शिव शंकराची उपासना केली जाते. त्यामुळे त्यांचे विधान चूक आहे.”

मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमधील 400 हून अधिक गावांमध्ये काल गारपिटीमुळे हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. शेतीचं मोठं नुकसाना झालं आहे.

पाहा काय म्हणाले भाजप नेते रमेश सक्सेना?