माध्यमांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या की, “कंबरदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे चालण्या-फिरण्यास त्रास होत आहे. याच कारणास्तव मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही. झांसीच्या जनतेने जे प्रेम आणि स्नेह दिला, त्याबद्दल मी सदैव त्यांची सदैव ऋणी राहिन.”
त्या पुढे म्हणाल्या की, “लोकसभेत भाजपचे दोन खासदार होते, तेव्हापासून आत्तापर्यंत पक्षासाठी काम केलं, आणि पुढेही करत राहिन. पण आता शरीर साथ देत नाही आहे. मात्र, सध्या भाजप हा देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झाल्याचा आनंद आहे.”
विशेष म्हणजे, त्यांनी यावेळी बोलताना आपण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच विजय होईल, आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमा भारती यांनी झांसी मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
उमा भारतींचा अल्प परिचय
उमा भारतींचा जन्म 3 मे 1959 रोजी मध्य प्रदेशमधील टीकमगढ जिल्ह्यात झाला. साध्वी ऋतम्भरा यांच्यासोबत राम मंदिर आंदोलात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांच्यांकडे मनुष्यबळ विकास, पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयासारखी महत्त्वाची खाती होती. 2003 ची विधानसभा निवडणूक मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक उमा भारतींच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवत, त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण ऑगस्ट 2004 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे गंगा स्वच्छता मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण काही काळानंतर त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं. सध्या त्यांच्याकडे केवळ स्वच्छता आणि पेयजल खातं आहे.