Wrestler Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा पीटी उषा (PT Usha) यांनी टीका केली. पीटी उषा यांनी गुरुवारी (27 एप्रिल) कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत बोलताना म्हटलं की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडे लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी एक समिती आहे. रस्त्यावर उतरण्याऐवजी ते (आंदोलक पैलवान/कुस्तीपटू) आधी आमच्याकडे येऊ शकले असते, पण ते आयओएमध्ये आलेच नाहीत. केवळ कुस्तीपटूंसाठीच नाही तर खेळासाठीही ते चांगलं नाही. त्यांनी थोडी शिस्तही बाळगली पाहिजे. पैलवानांच्या निषेधामुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचंही पीटी उषा म्हणाल्या.
रस्त्यावर उतरण्याऐवजी त्यांनी आधी आयओएमध्ये यायला हवं होतं!
पीटी उषा यांना विचारण्यात आलं होतं की, आयओए हे कुस्तीपटूंशी संपर्क साधेल का? कारण ते त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. शिवाय कुस्तीपटू त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्याला उत्तर देताना पीटी उषा म्हणाल्या की, "थोडी शिस्त असावी. रस्त्यावर उतरण्याऐवजी त्यांनी आधी आयओएमध्ये यायला हवं होतं. पण ते आमच्याकडे आलेच नाहीत. हे खेळासाठी चांगले नाही."
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या की, खेळाडूंनी रस्त्यांवर निदर्शने करणे हे बेशिस्तीचं लक्षण आहे आणि ते देशाची प्रतिमा खराब करत आहेत. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सरकार नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि खेळ आणि खेळाडूंना त्यांचे प्राधान्य आहे असे ठणकावून सांगितल्यानंतरही असे घडले. आयओएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग बाजवा, माजी नेमबाज सुमा शिरूर आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांना कुस्ती मंडळ चालवण्यासाठी आणि निवडणुका घेण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे, उषा यांनी सांगितलं. IOA कडे ऍथलीट्स आयोग आहे. . . रस्त्यावर उतरण्याऐवजी महिला पैलवान आमच्याकडे येऊ शकल्या असत्या असं त्या म्हणाल्या.
एक महिला म्हणून पीटी उषा या महिलांच्या वेदना समजू शकल्या नाहीत! - बजरंग पुनिया
माजी स्प्रिंट क्वीनने केलेले वक्तव्य जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पटलेलं नाही. “एक महिला आणि माजी खेळाडू म्हणून पीटी उषा यांनी अशी वक्तव्यं केल्याने मी अत्यंत निराश झालेय. पीटी उषा यंनी असं वक्तव्य करणं हे अपेक्षित नव्हतं. हे दुर्दैव आहे की एक महिला म्हणून त्यांना या महिलांच्या वेदना समजू शकल्या नाहीत,” ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने पीटी उषाच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.
पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील : कुस्तीपटू विनेश फोगाट
कुस्तीपटू विनेश फोगाटनं पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. आपण संविधानानुसार जगतो आणि स्वतंत्र नागरिक आहोत, असं विनेश म्हणाली. आपण कुठेही जाऊ शकतो, आम्ही बाहेर रस्त्यावर बसलो आहोत तर काहीतरी कारण असेलंच ना? आमचं कोणी ऐकलं नाही, यामागेही काहीतरी कारण असावं, मग ते आयओए असो वा क्रीडा मंत्रालय. फोगट म्हणाली की, तिनं पीटी उषा यांना फोनही केला होता, पण त्यांनी फोनही उचलला नाही.
सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह शरण सिंह यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनेकदा तक्रार करूनही समिती त्यांचे ऐकत नसल्याचं पैलवानांचं म्हणणं आहे. परिणामी पैलवान रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायत. याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. आता पुढे त्यांना कसा न्याय मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल.