नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने अॅक्सिस बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला दणका दिला आहे. अॅक्सिस बँकेला 3 कोटी, तर इंडियन ओव्हरसीज बँकेला 2 कोटींचा दंड ठोठावला आहे. कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.


अॅक्सिस बँकेवर थकित कर्जाशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, तर इंडियन ओव्हरसीज बँकेवर केवायसीशी संबंधित (नो युअर कस्टमर) सूचनांच्या उल्लंघनाचा आरोप आहे. या प्रकरणी या दोन्ही बँकांवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली.

आरबीआयने अॅक्सिस बँकेच्या 31 मार्च 2016 पर्यंतच्या आर्थिक स्थितीची चौकशी केली होती आणि या वर्षातील चौकशीच्या आधारेच अॅक्सिस बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अंतर्गत तपासानंतर एनपीए निश्चित करण्यासंबंधी मार्गदर्शक नियमांचं उल्लंघन केल्याचे समोर आले, असे आरबीआयने सांगितले. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2018 रोजी आरबीआयने अॅक्सिस बँकेला 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

इंडियन ओव्हरसीज बँकेवरील दंडात्मक कारवाईप्रकरणी आरबीआयने म्हटले की, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका शाखेच्या गैरव्यवहाराची चौकशी केली गेली. त्यानंतर बँकेचा अंतर्गत तपासणी अहवाल आणि इतर कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. यामध्ये असे लक्षात आले की, केवायसीसंदर्भातील नियम व अटींची पूर्तता या बँकेने केली नाही. त्यामुळे 2 कोटींची दंडात्मक करावाई करण्यात आली.