दिल्ली : आजपासून दिल्लीत 'रायसिना डायलॉग' संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात 65 देशांचे 250 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी संमेलनाचं उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

या संमेलनात नव्या जागतिक समस्या आणि सायबर सुरक्षा यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मागच्या वर्षीही या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे संमेलन यशस्वी झाल्यानंतर यावर्षीही त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दि न्यू नॉर्मल : मल्टीलेटरलिजम विथ मल्टी पोलॅरिटी असा या संमेलनाचा विषय असेल.

या संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी पंतप्रधानांचं भाषणही होणार आहे. या संमेलनात जागतिक पातळीवरील मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत, ज्यात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करजई यांचाही समावेश आहे. या संमेलनावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंतोनियो गुटरेस व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिनिधींना संबोधित करणार आहेत. मागील वर्षी झालेल्या या संमेलनात 40 देशांच्या 120 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता.