सरकारी रुग्णालयात उंदराने नवजात बाळाची बोटं कुरतडली
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2017 08:15 AM (IST)
जयपूर : राजस्थानमधील बांसवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी रुग्णालयात उंदराने चार दिवसांच्या नवजात बाळाची बोटं कुरतडल्याची घटना घडली. बांसवाडा येथील एमजी रुग्णालयातील ही घटना आहे. राजस्थाची राजधानी जयपूरपासून 500 किमी अंतरावर असलेल्या बांसवाडा येथील एमजी रुग्णालयातील या घटनेने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली. प्रियंका नावाच्या युवतीने चार दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला. समोवारी पहाटे पाचच्या सुमारास उंदराने मुलाची बोटं कुरतडली. या घटनेदरम्यान रुग्णालयात वीज नव्हती. वीज आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीमध्ये डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचा समावेश आहे, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्याने दिली.