मुंबई : भारतीय रॅपर हार्ड कौर पुन्हा एकदा वादात सापडली आहे. खलिस्तानी समर्थकांसह हार्ड कौर भारतापासून स्वतंत्र खलिस्तानची मागणी करताना एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात तिने अपशब्द वापरले आहेत.

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या समर्थकांना तिने पाठिंबा दिला. ते म्हणाले की, "हा आमचा हक्क असून आम्ही तो मिळवणारच. येणारा 15 ऑगस्ट हा शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. त्यामुळे 15 ऑगस्टला खलिस्तानी झेंडे फडकावणार आहोत. आम्ही शांत बसणार नाही, हे दाखवून देणार आहोत. यासाठी आम्ही युकेमध्ये भारतीय उच्चायुक्तासमोर खलिस्तानचा झेंडा फडकावणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घाबरतात, त्यामुळे ते सैन्याच्या मागे लपून आपला अजेंडा राबवतात. ते लोकांना घाबरवतात. यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. सरकारला घाबरण्याची गरज नाही. मागील बऱ्याच काळापासून ते आपला आवाज दाबत आहेत.


रॅपर हार्ड कौर या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्य आणि प्रशासनाचा विरोध करताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर हार्ड कौरविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ती म्हणाली की, "मी कोणालाही मारलेलं नाही. मी कोणावर बलात्कार केलेला नाही. मी फक्त टीका करते, जो माझा अधिकार आहे. माझा हक्क आहे. ज्या मुली हा व्हिडीओ पाहत आहेत, त्यांना माहित असायला हवं. मी माझ्या व्हिडीओमध्ये बंदूक ठेवलेली नाही, कधी बंदुकीबद्दल बोलले नाही. माझ्या मेंदू आणि हातात खूप ताकद आहे."

कोण आहे हार्ड कौर?
रॅपर हार्ड कौरचा जन्म 29 जुलै 1979 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झाला होता. ततिचं खरं  नाव तरुण कौर ढिल्लन आहे. तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आणि पार्श्वगायिका म्हणून काम केलं आहे. तसंच हार्ड कौर स्वत:ला पहिली भारतीय महिला रॅपर असल्याचंही सांगते.