श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटवल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. येत्या 15 ऑगस्टला अर्थात स्वातंत्र्यदिनाला गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याचं कळतं. अमित शाह गुरुवारी श्रीनगरला भेट देणार आहेत, त्यासाठी सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र जम्मू काश्मीर राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर अमित शाह यांच्या पहिल्या भेटीबाबत जम्मू काश्मीर पोलिस मुख्यालयाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या काश्मीर खोऱ्यात असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसंच स्वातंत्र्यदिनी ते लाल चौकात उपस्थित असतील, असंही सूत्रांनी सांगितलं.
अमित शाह काश्मीर खोऱ्यात भेट देणार आहेत, पण या क्षणी भेटीची तारीख मीडियाला सांगता येणार नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. हा सुरक्षेचा मुद्दा आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असल्याने गृहमंत्र्यांच्या काश्मीर भेटीबाबत आधीच सांगता येणार नाही, असं गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितलं.
सामान्यत: गृहमंत्री बीएसएफच्या विमानातून प्रवास करतात. त्यांचा कार्यक्रम अखेरच्या क्षणी सीआयएसफसह इतर सरकारी यंत्रणांना सांगितला जातो. देशातील विमानतळाची सुरक्षा सीआयसीएफकडे असते. तसंच अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील असल्याने त्यांना अधिक धोका असू शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.
मोदी-शाहांसाठी अविस्मरणीय घटना
श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणं ही गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय घटना ठरेल. पाकिस्तानमधील विविध दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता असतानाही, 1992 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी पंतप्रधान मोदींसह लाल चौकात तिरंगा फडकावला होता.
26 जानेवारी 2011 रोजी लाल चौकात अखेरचा तिरंगा फडकला
लाल चौक हा श्रीनगरमधील महत्त्वाचं ठिकाण आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1948 मध्ये लाल चौकात तिरंगा फडकावला होता, तेव्हापासून लाल चौकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. लाल चौकात तिरंगा फडकावण्यावरुन फुटीरतावादी आणि राष्ट्रवाद्यांमध्ये कायमच वाद होत असतो. देशासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या लाल चौकात 26 जानेवारी 2011 रोजी अखेरचा तिरंगा फडकावण्यात आला होता. कडेकोट सुरक्षा असतानाही राजस्थानमधील भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांनी हे काम केलं होतं. विशेष म्हणजे हा तिरंगा राजस्थानच्या कोटा शहरात बनवला होता.
काश्मीरमध्ये तणाव, कडेकोट सुरक्षाव्यवस्था
कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही संचारबंदी लागू आहे. काश्मीर खोऱ्यासह जम्मूच्या कानाकोपऱ्यात सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास 8 हजार आणखी जवानांना काश्मीरच्या विविध भागांमध्ये तैनात केलं आहे. काश्मीरशिवाय जम्मूमध्ये सैन्याच्या सहा कंपन्यांसह निमलष्करी दलाचे जवानही तैनात आहेत.
गृहमंत्री अमित शाह स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2019 08:44 AM (IST)
अमित शाह काश्मीर खोऱ्यात भेट देणार आहेत, पण या क्षणी भेटीची तारीख मीडियाला सांगता येणार नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -