नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत असलेल्या गुन्हेगारांना दया याचिकेचा अधिकार मिळू नये, असे वक्तव्य कोविंद यांनी केलं आहे. यासंदर्भात संसदेत चर्चा व्हावी, असेही यांनी म्हटले आहे.

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असणाऱ्या विनय शर्मा याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे. माफीचा हा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळावा, असा सल्ला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना दयेची याचिका दाखल करण्याची परवानगीच मिळू नये. संसदेने दयेच्या याचिकेबाबत समिक्षा करावी, असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, गृहमंत्रालय आणि दिल्ली सरकारच्या सल्ल्यानंतरच राष्ट्रपती दया याचिकेबाबतचा निर्णय घेतील. दिल्ली सरकारने यापूर्वीच आरोपींचा दयेचा अर्ज स्वीकारु नये, असा अहवाल राष्ट्रपतींना पाठवला आहे.