Rana Ayyub Money Laundering Case : : राजकीय नेत्यांपाठोपाठ आता पत्रकारही ईडीच्या रडारवर येऊ लागलेत. पत्रकार राणा अयुब (Rana Ayyub) यांची 1 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. ईडीचा फेरा सध्या राजकीय वर्तुळात तर चर्चेत असतोच. पण आता पत्रकारही त्या लिस्टवर दिसतायत. पत्रकार राणा अयुब यांची 1.77 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय. 


एका पत्रकारावर ईडीची कारवाई का झाली या उत्तराआधी मुळात राणा अयुब कोण आहेत हे जाणून घेऊयात. 37 वर्षांच्या राणा अयुब या मोदी सरकारच्या प्रखर टीकाकार पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. 2002 च्या गुजरात दंगलीवर गोध्रा फाईल्स या पुस्तकाच्या त्या लेखिका. शिवाय वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखनाचंही काम त्या करतात. 


राणा अयुब यांच्याविरोधात सप्टेंबर 2021 मधे गाझियाबादमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. हिंदू आयटी सेल या एनजीओचे संस्थापक विकास संक्रितायन यांनी अयुब यांनी मदतनिधी गोळा करुन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्याच आधारावर ईडीनं ही जप्तीची कारवाई केली आहे. 


राणा अयुब यांनी मदतनिधी कुटुंबासाठीच वापरल्याचा आरोप


2020 ते 21 या काळात तीन मोहीमांसाठी अयुब यांनी किटो या क्राऊड फंडिग साईटवरुन निधी गोळा केला. 
आसाम बिहार, महाराष्ट्रातल्या पुरासाठी मदत आणि झोपडपट्टीवासियांना मदत, कोरोना काळातली मदत मोहीम यासाठी त्यांनी हा फंड उभा केला
जवळपास 2 कोटी 69 लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला
पण यातले 72 लाख स्वतच्या नावावर, 37 लाख बहिणीच्या खात्यात आणि 1 कोटी 60 लाख रुपये वडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले
ज्या कामासाठी पैसे गोळा करण्यात आले ते प्रत्यक्षात त्यासाठी खर्च झालेच नाहीत असा आरोप
याच पैशातून 50 लाख रुपयांची एफडी  राणा अयुब यांनी केल्याचाही आरोप
74 लाख रुपये अयुब यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडातही जमा केल्याचं दिसतंय.


31 लाख रुपये मदतीसाठी वाटल्याचा राणा अयुब यांचा दावा आहे, पण त्यांनी प्रत्यक्षात 17 लाख रुपयांचीच बिलं दिलं. काही बिलं खोटी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. अद्याप या सगळ्या कारवाईवर अयुब यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. जप्तीच्या कारवाईला पीएमएलए कोर्टात आव्हान देता येतं, त्यामुळे अयुब यांचं पुढचं पाऊल काय असणार हेही पाहावं लागेल. 


ईडीची कारवायांवरुन आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सतत पाहायला मिळतं. चूक घडल्यानंतर कारवाई होणारच हा भाजप नेत्यांचा दावा असतो तर केवळ विरोधकांवरच कारवाई कशी होते असं म्हणत विरोधक हल्लाबोल करतात. त्यात आता ही कारवाई पत्रकारांवरही होताना दिसतेय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha