बेळगाव : मागील आठवड्यात अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली होती. युवतीला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी केला होता. शिवाय रमेश जारकीहोळी यांचे काही अश्लील व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सीडी प्रकरणातील तरुणीने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात रमेश जारकीहोळी यांच्यावर काही आरोप लावण्यात आले आहेत. यात सीडी प्रकरणाचा व्हिडिओ कोणी केलाय, कसा केलाय याची मला काही कल्पना नाही. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची अब्रू गेली. लोक आमच्या घराकडे येवून चौकशी करत आहेत. माझ्या आई-वडिलांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मी देखील तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे या व्हिडीओतून तरुणीने सांगितले आहे.
मला संरक्षण द्या, सीडी प्रकरणातील तरुणीची मागणी
आमच्या पाठीशी कोणीही नाही. आम्हाला कोणाचाही राजकीय पाठिंबा नाही. रमेश जारकीहोळी यांनी नोकरी देतो म्हणून सांगितले आणि नंतर काही केलं नाही. नंतर व्हिडिओ देखील त्यांनीच बाहेर आणला आहे. मला संरक्षण द्या अशी मागणी सीडी प्रकरणातील तरुणीने कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे केली आहे. तरुणीने हा व्हिडिओ प्रसारित केल्यावर सगळ्या वाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी देखील बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना त्या तरुणीला सुरक्षा देण्यासाठी एसआयटीला सांगितल्याची माहिती दिली. दरम्यान तरुणीच्या व्हिडिओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून अध्यक्षा प्रमिला नायक यांनी त्या तरुणीने घाबरु नये, आत्महत्या हा उपाय नव्हे असे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.
दिनेश कलहळ्ळी यांनी 2 मार्चला शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. आपल्या तक्रारीत दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे की, "रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार 25 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं." तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे गाऱ्हाणं मांडल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी कलहळ्ळी यांनी केली.