नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात प्रकरणाचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर 6 डिसेंबरपासून राम मंदिराचे बांधकाम सुरु होईल, असं भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.


अयोध्येमध्ये 6 डिसेंबरपासून राम मंदिर निर्माणाचे काम सुरु होईल. राम मंदिराचे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होईल, असंही साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. यावेळा खासदार साक्षी महाराज यांनी  दोन्ही पक्षांची बाजू गंभीरतेने समजून घेतल्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायमूर्तींचे आभार मानले.


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळात राम मंदिराची निर्मिती होईल. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन राम मंदिराची उभारणी करतील, असं माझं अंर्तमन सांगत असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलं.


मोदी सरकारने ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं त्याचप्रमाणे राम मंदिराचा निर्णयही ऐतिहासिक ठरणार आहे. याचं श्रेय सुप्रीम कोर्टाला जातं. तसेच मुस्लीम जनतेलाही यांच श्रेय जातं, ज्यांनी याप्रकरणात राम मंदिराला समर्थन दिलं, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं.