नवी दिल्ली: केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अन्यथा दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असं राकेश टिकेत यांनी सांगितलंय. येत्या काही काळात 40 लाख ट्रॅक्टर या आंदोलनाशी जोडणार असल्याचंही राकेश टिकेत यांनी सांगितलं.


केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यावर बोलताना राकेत टिकेत म्हणाले की, "दिल्लीत लुटेरे बसले आहेत. त्यांना तिथून हाकलवून लावलं पाहिजे. जर घरात चोरी करण्यासाठी चोर आले तर त्यांना यज्ञ करुन कसं काय बाहेर काढता येणार? यांनी तर पूर्ण देशाला लुटायचं काम सुरु केलंय. कंपनी जेव्हा शेतकऱ्यांकडून त्याचं उत्पादन विकत घेईल त्यावेळी त्यांनी एमएसपी द्यावी इतकीच मागणी आमची आहे."


एमएसपीवर कोणताही कायदा का तयार केला जात नाही असा सवाल करत राकेश टिकेत म्हणाले की, "ज्या कंपन्या लूट करत आहेत त्यांना माघारी जावंच लागेल. बटाटा आणि मोहरीला काय दर मिळतोय आज? आज केवळ पाच रुपयाने आपले उत्पादन शेतकऱ्यांना विकावं लागतंय."


Toolkit Case | टूलकिट प्रकरणात दिशा रवीला दिलासा, जामीन मंजूर


दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसा झाली. त्या हिंसेचा शेतकरी आंदोलनाशी काय संबंध असा प्रश्नही राकेश टिकेत यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, "प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर एका धर्माचा ध्वड फडकवण्यात आला. ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर केंद्र सरकार कोणती कारवाई करतंय हे सरकारने स्पष्ट करावं."


केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या तीन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या आधी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये या कायद्यांवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत पण कोणताही तोडगा निघाला नाही. सध्या सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा होत नाही.


नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींचा एल्गार, आज वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली