अहमदाबाद: जगातल्या सर्वात मोठ्या अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला आज नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आलं आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या स्टेडियमला दोन बॉलिंग एन्ड आहेत, एक अदानी एन्ड आणि दुसरं रिलायन्स एन्ड. आता या गोष्टीवरुन सोशल मीडियावर आता कमेन्टचा पाऊस पडताना दिसत आहे.


नरेंद्र मोदी हे उद्योगपतींच्यासाठी काम करत असल्याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर होतोय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचे सरकार हे 'हम दो हमारे दो' यांचं सरकार असल्याचा आरोप केलेला. आता ज्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलंय त्या स्टेडियमवर दोन बॉलिंग एन्ड आहेत, म्हणजे पीचच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी करता येते. यातील एका बॉलिंग एन्डचे नाव अदानी एन्ड तर दुसऱ्या बॉलिंग एन्डचे नाव रिलायन्स एन्ड आहे.


आता या गोष्टीवरुन राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या आता हे सुंदर सत्य बाहेर आलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमला दोन एन्ड आहेत, एक अदानी एन्ड तर दुसरं रिलायन्स एन्ड. आणि त्याचे अध्यक्ष जय शाह आहेत."





सोशल मीडियावरही या गोष्टीवरुन मोठी टीका होत आहे तर यावर गमतीदार कमेंन्टही केल्या जात आहेत.


कसं आहे 'नरेंद्र मोदी स्टेडियम'?
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.


Motera Stadium Renamed: जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नामकरण