Rakesh Rikait : वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि त्यांचा भाऊ नरेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. टिकैत यांच्यावरील या कारवाईमुळे देशातील ही मोठी शेतकरी संघटना आता दोन गटात विभागली गेली असल्याचे बोलले जात आहे.   

Continues below advertisement

भारतीय किसान युनियनचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी लखनऊ येथे  भारतीय किसान युनियनच्या नेत्यांची बैठक झाली. राजेश सिंह चौहान हे या बैठकीचे अध्यक्ष  होते.  या बैठकीत भारतीय किसान युनियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संघटनेचे अध्यक्ष राजेश सिंह चौहान हे स्वतः आहेत. नरेश सिंह टिकैत हे आतापर्यंत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष होते. परंतु, भारतीय किसान युनियनच्या या बैठकीला नरेश टिकैत आणि राकेश टिकैत उपस्थित नव्हते. 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला उपस्थित असलेले सर्व शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात आले. राकेश टिकैत यांनी आंदोलनाचा वैयक्तिक फायदा घेतल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला. राकेश टिकैत हे वेगवेगळ्या पक्षांच्या मंचावर जात असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे नरेश सिंह टिकैत यांना युनियनच्या अध्यपदावरून हटवण्यासह राकेश टिकैत यांना युनियनमधून काढून टाकण्याचा प्रस्ताव सभेत आणण्यात आला. त्यानंतर या दोघांनाही संघटनेतून बाहेर करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

Continues below advertisement

दरम्यान, चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त राकेश टिकैत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, ‘तुमचा संघर्ष आणि लढाई या देशातील शेतकरी, मजूर, आदिवासी, दलित शुद्र, आदींसाठी लढण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत निरंतर करत राहू. तुमच्यासोबतचे ते संघर्षाचे दिवस आमच्या आठवणीत आहेत. तुमचा राकेश टिकैत.’