सीबीआयच्या विशेष संचालकपदी IPS राकेश अस्थाना
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2017 09:18 AM (IST)
राकेश अस्थाना हे 1984 च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
नवी दिल्ली : आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या विशेष संचालकपदी पदोन्नती झाली आहे. राकेश अस्थाना हे 1984 च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सीबीआयच्या विशेष संचालकपदी पदोन्नती झाल्याने राकेश अस्थाना हे आता सीबीआयचे संचालक अलोक शर्मा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी असतील. अस्थाना यांच्याकडे सध्या सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदाची जबाबदारी होती. अनिल सिन्हांच्या निवृत्तीनंतर राकेश अस्थाना यांनी मुख्य अंतरिम तपासाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. फेब्रुवारी 2002 च्या गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाच्या विशेष तपास पथकाचं नेतृत्त्वही अस्थांनांनी केले होते. बिहारमधील चारा घोटाळ्याच्या तपास प्रक्रियेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. शिवाय, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाच्या तपासातही अस्थाना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राकेश अस्थाना यांच्यासोबतच एकूण 8 आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.