अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला बंपर गिफ्ट दिलं आहे. 615 कोटींच्या रो-रो सेवेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मोदी सध्या भावनगरच्या दौऱ्यावर आहेत.
रो-रो सेवेच्या मदतीने गुजरातला लाभलेल्या समुद्राचा पुरेपुर उपयोग करता येईल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. रो-रोच्या मदतीने एका फेरीत 500 प्रवासी आणि 100 वाहनांची ने-आण करता येणार आहे. रस्ते मार्गाने दोन्ही शहरातील अंतर हे 310 किमी इतकं आहे. पण या नौका सेवेमुळे हे अंतर घटून 30 किमींवर येईल.
गुजरातमधील ही दक्षिण आशियामधली आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली रो-रो सेवा आहे. रो-रो सेवेचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी बडोद्यामध्ये रोड शोही केला. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी गुजरातला रो-रो सेवेचं गिफ्ट दिलं आहे.
जी वस्तू रस्ते मार्गाने नेण्यासाठी दीड रूपये खर्च येत होता. तेच साहित्य जल मार्गाने नेण्यासाठी फक्त 20 ते 25 पैसे खर्च येईल. यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन बचत होईल. त्याचबरोबर वेळही वाचेल. यापूर्वीच्या सरकारने पर्यावरणाचं नाव पुढे करत रो-रो सेवेत अडथळा आणला, असं म्हणत भविष्यात ही सेवा मुंबईपर्यंत आणली जाईल, असंही मोदी म्हणाले.