नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये गृहमंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं दिसून आलं. टीएमसीचे खासदार साकेत गोखले यांनी अमित शाह यांच्यावर एक आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यानंतर अमित शाह चांगलेच भडकले. कुणाच्या उपकारावर संसदेत आलो नाही, निवडणूक जिंकून इथे पोहोचलो असल्याचं सांगत अमित शाहांनी साकेत गोखले यांना टोला लगावला.
बुधवारी राज्यसभेत गृहमंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी टीएमसी खासदार साकेत गोखले यांना फटकारल्याचं दिसून आलं. गृहमंत्रालयावरील चर्चेदरम्यान साकेत गोखले यांनी ईडी आणि सीबीआयचा मुद्दा उपस्थित केला. यावर अमित शहा म्हणाले, गृहमंत्रालयासंबंधी चर्चा होत आहे पण साकेत गोखले ईडी आणि सीबीआयची चर्चा करत आहेत. पण तरीही त्यांना हा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर मलाही संधी द्यावी आणि मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन.
अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर साकेत गोखलेंनी त्यांच्यावर एक टिप्पणी केली. त्यानंतर अमित शाह चांगलेच भडकले. मी कोणाच्याही मेहरबानीवर संसदेत आलो नाही, निवडणूक जिंकून येथे आलो आहे.
अमित शाह म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंगालमध्ये निवडणूक हिंसाचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत, जिथे आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तक्रारदारांनी हायकोर्ट गाठले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने सर्व गुन्हे पुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. हेही तेच प्रकरण आहे. तृणमूल काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, उच्च न्यायालयावर विश्वास नाही."
शब्द मागे घेण्यास साकेत गोखलेंचा नकार
सभागृहात जोरदार चर्चा सुरू असताना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी साकेत गोखले यांना त्यांनी केलेली टिप्पणी मागे घेण्यास सांगितले. त्यावर साकेत गोखले म्हणाले, मी माझे शब्द परत घेणार नाही. फक्त तुमचे नाव अमित शहा आहे, याचा अर्थ तुम्ही हुकूमशाही कराल असा होत नाही.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, साकेत गोखले यांनी चर्चेदरम्यान एकही सूचना दिली नाही, उलट वैयक्तिक हल्ले केले. आजपर्यंत एकाही सदस्याने अशा पद्धतीने वादविवाद करताना पाहिले नाही, त्यांनी राज्यसभेची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
शब्द कामकाजातून काढून टाकले
साकेत गोखले यांनी अमित शाहांवर केलेली टिप्पणी कामकाजातून काढून टाकण्यात आली. तसा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड यांनी घेतला.
ही बातमी वाचा: