Delhi-Kathmandu Maitri Bus : दिल्ली परिवहन महामंडळाने (DTC) प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने दिल्ली-काठमांडू मैत्री बस सेवेची वेळ आणि मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल सांगताना दिल्ली परिवहन महामंडळाचे उपमुख्य महाव्यवस्थापक संजय सक्सेना म्हणाले की, सध्या काठमांडूला जाणारी बस सकाळी 10 वाजता डॉ. आंबेडकर स्टेडियम टर्मिनल, दिल्ली गेट येथून आग्रा-कानपूर-लखनौ महामार्गाने निघते. परंतु, आता बसमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी ही बस लखनौ एक्सप्रेस हायवे मार्गावरून चालवली जाईल.


बदललेल्या मार्गामुळे प्रवासादरम्यान सुमारे 49 किलोमीटरचे अंतर कमी होईल आणि बसचे प्रति प्रवास भाडे 2774 रुपये असेल. सक्षम प्राधिकरणाच्या निवेदनानुसार प्रवाशांची संख्या वाढवणे आणि दिल्ली ते काठमांडू बससेवेचा प्रवास वेळ कमी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.


प्रवासाचा वेळ कमी होणार!


दिल्लीतील मजनू का टिला हे काठमांडूला जाणाऱ्या प्रवाशांचे मुख्य केंद्र आहे. आता या नव्या वेळेनुसार प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पहाटे 5 वाजता बस मजनू का तिला रवाना केली जाईल आणि तेथून सकाळी 6 वाजता बस दिल्ली गेट टर्मिनलच्या दिशेने रवाना होईल. भारत-नेपाळ सीमेवर प्रवाशांना 4-5 तास प्रतीक्षा करावी लागते. हा वेळ वाचवण्यासाठी ही बस दिल्ली गेट टर्मिनलवरून काठमांडूसाठी सध्याच्या वेळेनुसार तीन तास आधी म्हणजेच सकाळी 10 ऐवजी सकाळी 7 वाजताच निघेल. जर, बस सकाळी 7 वाजता सुटली तर, ती त्याच रात्री भारताची सीमा ओलांडू शकते आणि प्रवासी इतर बसच्या तुलनेत लवकर काठमांडूला पोहचू शकतील. या नवीन वेळ आणि मार्गानुसार प्रवासाचे सुमारे 7-8 तास कमी केले जाऊ शकतात. हा प्रवास 25-26 तासांचा असेल. सध्या ही बस सकाळी 10 वाजता सुटते, तर काठमांडूला पोहोचण्यासाठी 32-34 तास लागतात.


केवळ तीन थांबे असणार


प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 6 वाजता एक डीटीसी अधिकारी मजनू का टिला येथे तिकीट बुकिंगसाठी आणि बस सोडण्यासाठी नियुक्त केला जाईल. जादा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी बसला केवळ तीन थांबे असतील. भारतात सकाळी 10 वाजता आग्रा टोल येथील फूडिंग प्लाझा आणि दुपारी 2 वाजता लखनौ येथील फूड किंग प्लाझा हे दोन थांबे असतील. तर, नेपाळमध्ये रात्री 10.30 वाजता बस थांबेल जेणेकरून प्रवाशांना रात्रीचे जेवण घेता येईल. अशी माहिती दिल्ली परिवहन महामंडळाचे उपमुख्य महाव्यवस्थापक संजय सक्सेना यांनी दिली.


काठमांडू ते दिल्ली मार्गावर कोणतेही बदल नाहीत!


बदललेल्या वेळा आणि मार्गांनुसार 13 जूनपासून दिल्ली-काठमांडू बस सेवा एक महिना प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाईल. मात्र, काठमांडूहून दिल्लीत येणाऱ्या बससेवेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही बस दिल्ली आणि काठमांडू दरम्यान 1,167 किमी अंतर व्यापते. सध्या ही बस उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद आणि फैजाबाद, तर नेपाळमधील मुगलिंग नेपाळ येथे थांबते. या प्रवासाचे भाडे सुमारे 2800 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी माहितीत सांगितले.


दिल्लीहून काठमांडूला जाणाऱ्या बस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटतात. तर, काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या बसेस तिथून मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सुटतात. नोव्हेंबर 2014मध्ये ‘दिल्ली-काठमांडू मैत्री’ बससेवा सुरू करण्यात आली होती.


हेही वाचा :


Parshottam Rupala : शेतकरी कल्याणाला मोदी सरकारचं सर्वोच्च प्राधान्य, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी अनुदान : पुरुषोत्तम रुपाला


Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा कायम, जाणून घ्या आजचे नवे दर