नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीची हवा निघाली आहे. आधी टीएमसी, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार द्यायला नकार दिल्यानंतर, अखेर काँग्रेसला स्वत:चाच उमेदवार यूपीएकडून देण्याची वेळ आली. राज्यसभेत विरोधकांची स्थिती मजबूत असताना, विजयासाठी अगदी थोडेसेच प्रयत्न करायचे बाकी असतानाही बीजेडीने साथ न दिल्याने यूपीए काहीशी बॅकफूटवर गेली आहे. एनडीएकडून जेडीयूचे हरिवंश तर यूपीएकडून काँग्रेसचे बी के हरिप्रसाद आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या सकाळी 11 वाजता उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
उपसभापती निवडणूक : अखेर विरोधकांचाही उमेदवार जाहीर!
शरद पवारांनी का घेतली माघार?
काल उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. दुपारी एक वाजता मीटिंग झाल्यानंतर त्यात हेच नाव पक्कं झालं होतं. मात्र शरद पवारांनी बीजेडीचे नवीन पटनायक यांना फोन केला, तेव्हा नवीनबाबूंनी नितीशकुमारांनी आधीच समर्थन मागितल्याने, आपण त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं. नवीन पटनायकांची ही भूमिका काँग्रेसला कळवून पवारांनी ते साथ देत नसतील तर आपला उमेदवार देण्यात रस नाही अशी भूमिका घेतली.
राज्यसभा : यूपीएमध्ये एकजूटता नाही, राष्ट्रवादीचा लढण्यास नकार?
काय आहे गणित?
राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. दोन्ही बाजूंचे पक्के मित्रपक्ष पकडले तर यूपीए 115 आणि एनडीए 115 इतकी काट्याची टक्कर आहे. 9 खासदार असलेल्या बीजेडीचं मतदान ज्याच्या पारड्यात, तो विजेता अशी स्थिती होती. पण ओडिशात भाजप हा बीजेडीचा प्रमुख शत्रु असतानाही, उमेदवार नितीशकुमारांचा आहे असं सांगत बीजेडी एनडीएच्या गोटात शिरली आहे.
राज्यसभा उपसभापतीपद निवडणूक : शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन
2019 च्या आघाड्यांचं प्रतिबिंब
राज्यसभेच्या या निवडणुकीत पुढच्या लोकसभा निवडणुकीत आघाड्यांची जोडतोड कशी होऊ शकते याचं छोटं प्रतिबिंब पाहायला मिळालं. टीआरएस, एआयडीएमके, बीजेडी हे सगळे पक्ष भाजपप्रणित एनडीएच्या बाजूला उभे राहिले. तर शिवसेनाही निमूटपणे एनडीएलाच मतदान करणार आहे. त्यामुळे राज्यसभेत अगदी हातातोंडाशी आलेला विजय विरोधकांच्या हातातून निसटला आहे. सर्वाधिक 73 (नामनिर्देशित 8 पकडून) खासदार भाजपकडे असले तरी पूर्ण बहुमत नसल्याने भाजपने स्वत:चा उमेदवार दिला नाही. मित्रपक्षांना संधी दिल्याशिवाय भाजपलाही एनडीए मजबूत करता आली नसती.
दरम्यान करुणानिधींच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काही पक्षांनी केली आहे. डीएमकेचे चार खासदार उद्या मतदानावेळी गैरहजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक उद्या घेऊ नये अशी मागणी काही पक्षांनी सभापतींकडे केली आहे.
कुणाकडे किती बलाबल-
राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2018 03:40 PM (IST)
एनडीएकडून जेडीयूचे हरिवंश तर यूपीएकडून काँग्रेसचे बी के हरिप्रसाद आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या सकाळी 11 वाजता उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -