श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून त्याचा परिणाम पाकिस्तानला भोगावाच लागेल असा कडक इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तान (Gilgit Baltistan PoK) हे प्रदेश पाकिस्तानकडून भारतामध्ये परत आणल्यानंतरच भारताचं मिशन पूर्ण होणार असल्याचंही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये 'शौर्य दिवस' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. 


भारतीय वायू सेना आजच्या दिवशी म्हणजे, 27 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोहोचली होती. याच घटनेचं स्मरण म्हणून शौर्य दिन साजरा केला जातोय. 


राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये विकासाची यात्रा सुरू केली. जेव्हा आम्ही गिलगिट बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू त्यावेळी आमचं मिशन पूर्ण होईल. 


 






दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो 


पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर होत असलेल्या अत्याचारावरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टीका केली आहे. पाकिस्तानला याचा परिणाम भोगावा लागणार असा इशाराही त्यांनी दिला. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, त्यांच्या भारताला लक्ष्य करणे हे एकमेव ध्येय असल्याचं ते म्हणाले. 


काश्मीरसंबंधित असलेले 370 कलम रद्द केल्यानंतर या ठिकाणच्या लोकांबद्दल असलेला भेदभाव संपल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्यात आलं होतं.