नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा दावा खुलासा केला. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची तिन्ही सुरक्षा दलं पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी सज्ज होते असं राजनाथ सिंह म्हणाले. राजधानी दिल्लीत संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित कार्य़क्रमात ते बोलत होते.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की तिन्ही सैन्य दलांनी मोठं ऑपरेशन करण्याआधी कोणत्याही शस्त्रास्त्रांचा तुटवडा किंवा अन्य तक्रार व्यक्त केली नसल्याचंही सिंह म्हणाले. पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनसाठी सैन्य तयार आहे का, असं तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना विचारलं. तेव्हा त्यांनीही लगेच संमती दिल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी यावेळी जुन्या प्रसंगांची आठवण करून दिली. 1971 च्या युद्धात फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनी सहा महिन्यांचा वेळ मागितला होता, तर कारगिल युद्धात जनरल व्ही.पी. मलिक यांनी आधुनिक शस्त्रांच्या अभावाची कबुली दिली होती. मात्र यावेळी ऑपरेशन सिंदूर बाबत तिन्ही दलांनी तात्काळ मंजुरी दिली, असं राजनाथ सिंह म्हणाले.

युद्धामागे असतो संपूर्ण देश

राजनाथ सिंह यांनी सिव्हिल कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित करत म्हटले, "सैनिक युद्ध लढतो, पण त्या सैनिकाच्या मागे संपूर्ण देश आणि सिस्टम असते. त्यामुळे सिव्हिल-मिलिटरी समन्वय खूप महत्त्वाचा असतो."

अनपेक्षित संकटासाठी सज्जता हवी

सध्याच्या जागतिक घडामोडींवर भाष्य करत संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, "तीन-चार महिन्यांपूर्वी कोणालाही वाटले नव्हते की, ऑपरेशन सिंदूरसारखी स्थिती आपल्यासमोर उभी ठाकेल. आजचा काळ अत्यंत अनिश्चित असा आहे."

सिव्हिल कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे

राजनाथ सिंह म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये सिव्हिल कर्मचाऱ्यांचे योगदानही फार मोठे होते. वेगवेगळ्या विभागांनी युद्धासंदर्भात आवश्यक सर्व जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या."

ही बातमी वाचा: