Yamuna water level : उत्तर भारतात (North India) सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळं काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ (Yamuna water level) झाली आहे. यमुना नदीने धोक्याची पाणी पातळी गाठली आहे. दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर 205.39 मीटरपर्यंत यमुना नदीची पाणी पातळी पोहोचली आहे.


दरम्यान, केंद्रीय जल आयोगानं (CWC) दिलेल्या माहितीनुसार यमुना नदीची पाणी पातळी ही  205.33 मीटर ते 205.39 मीटरपर्यंत आहे. त्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगानं दिली आहे. यमुना नदीची धोक्याची पाणी पातळी ही  204.5 मीटर आहे. दरम्यान, एक महिन्यापूर्वी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागात पूर आला होता. 13 जुलै रोजी, दिल्लीतील यमुनेने 208.66 मीटर इतकी पूर पातळी नोंदवली होती. त्यामुळं दिल्लीत अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं होते. दरम्यान, सध्या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे. 


हिमाचलसह उत्तराखंडला मुसळधार पावसाचा मोठा फटका


हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 65 जणांनी आपला जीव गमावला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यात शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं हिमाचलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. साध्या पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 


हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ( 16 ऑगस्ट) आणि उद्या (17 ऑगस्ट) रोजी राजस्थानच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


India weather : मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका, आत्तापर्यंत 65 जणांचा मृत्यू, आज पावसाचा रेड अलर्ट