Indian Railways : गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे आता नॉन-एसी प्रवाशांसाठी चांगल्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या आधुनिक आणि सुरक्षित 'अमृत भारत ट्रेन्स'चा वेगाने प्रचार करत आहे. या ट्रेन्स केवळ किफायतशीर नसतील तर आता जागतिक दर्जाच्या सुविधाही असतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, भारतीय रेल्वेने सामान्य जनता आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना लक्षात घेऊन नॉन-एसी रेल्वे प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. परवडणाऱ्या भाड्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील प्रवाशांना प्रवास सुलभ ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. नॉन-एसी प्रवासाचा अनुभव अमृत भारत ट्रेन्सच्या स्वरूपात पूर्णपणे बदलला जात आहे. या ट्रेन्समध्ये आधुनिक सुविधा आणि उच्च सुरक्षा मानकांसह अपंगांसाठी अनुकूल कोच समाविष्ट आहेत.
रेल्वे पुढील 5 वर्षांत 17000 नवीन नॉन-एसी कोच सुरु करणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, रेल्वे पुढील 5 वर्षांत 17000 नवीन नॉन-एसी कोच सुरु करणार आहे. ज्यामुळे जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांना अधिक सुविधा मिळतील. मेल/एक्सप्रेस गाड्यांमधील 22 कोचपैकी 12 कोच जनरल/स्लीपर नॉन-एसी असतील आणि 8 कोच एसी असतील. याशिवाय, अनारक्षित प्रवाशांना मेमू/ईएमयू गाड्यांमधून प्रवास करण्याचा परवडणारा पर्याय देखील मिळत आहे. रेल्वे मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की रेल्वे भाडे निश्चित करताना अनेक पैलूंचा विचार केला जातो - सेवेचा खर्च, किंमत, सामाजिक-आर्थिक स्थिती, स्पर्धा आणि प्रवाशांची देय क्षमता. म्हणूनच, रेल्वेचे प्राधान्य म्हणजे प्रवास सामान्य माणसाच्या बजेटमध्ये राहावा. रेल्वेमंत्र्यांच्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1250 सामान्य कोच जोडले. यावरून हे स्पष्ट होते की रेल्वे जनरल आणि स्लीपर क्लास प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी सतत संसाधने वाढवत आहे.
सामान्य लोकांसाठी नॉन-एसी 'अमृत भारत ट्रेन'
रेल्वेने आतापर्यंत 100 पैकी 14 अमृत भारत ट्रेन चालवल्या आहेत. या ट्रेन पूर्णपणे नॉन-एसी आहेत आणि विशेषतः सामान्य लोकांसाठी सुरु केल्या आहेत.
- 11 जनरल कोच, 8 स्लीपर कोच, 1 पॅन्ट्री, 2 गार्ड कम अपंगांसाठी अनुकूल कोच
- शॉक-फ्री सेमी-ऑटोमॅटिक कपलर आणि क्रॅश ट्यूबने सुसज्ज स्ट्रक्चर
- सीसीटीव्ही, एलईडी लाईट्स, सर्व कोचमध्ये यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी चार्जिंग पॉइंट्स
- टॉयलेटमध्ये एरोसोल अग्निशामक प्रणाली
- ईपी ब्रेकिंग सिस्टम, चांगले जिने, वंदे भारत सारखी सीट डिझाइन
- इमर्जन्सी टॉक बॅक सिस्टम आणि पूर्णपणे बंद गॅंगवे
भारतीय रेल्वेचा हा उपक्रम दर्शवितो की ते केवळ उच्च वर्गासाठीच नव्हे तर गरीब आणि मध्यम वर्गासाठी देखील आधुनिक, सुरक्षित आणि परवडणारा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. भारताच्या सामाजिक-आर्थिक रचनेनुसार 'अमृत भारत' आणि 'नमो भारत' सेवा प्रत्येक वर्गाला लक्षात घेऊन डिझाइन केल्या आहेत. सेवेचा खर्च, किंमत, सामाजिक-आर्थिक घटक आणि वाहतुकीच्या इतर साधनांमधील स्पर्धा लक्षात घेऊन भाडे निश्चित केले जाते. अशा परिस्थितीत, सामान्य जनतेसाठी सोयीस्कर आणि परवडणारे प्रवास पर्याय राखणे हे भारतीय रेल्वेचे प्राधान्य आहे. रेल्वेने अलीकडेच नमो भारत रॅपिड रेल सेवा देखील सुरू केली आहे, जी जलद, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
महत्वाच्या बातम्या: