मुंबई : प्रवाशांना रेल्वेत चांगला अनुभव मिळावा यासाठी दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सोमवारी ई-बेडरोल सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून स्लीपर आणि अनारक्षित डब्यांमध्येही 250 रुपयांमध्ये दोन सुती चादर, एक उशी आणि एक रजई दिली जाणार आहे.

 

ही सेवा आयआरसीटीसीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. तिकीट बुकिंग करताना किंवा ट्रेन सुटण्यापूर्वी ई-बेडरोल सेवेचा वापर करता येईल. आयआरसीटीसीने रेल्वे स्थानकांवर ई-हब स्थापन केले आहे. या ई-हबमध्ये ई-कॅटरिंग, ई-बेडरोल आणि रिटायरिंग रुमची सुविधा पुरवली जाणार आहे.

 

सध्या बेडरोलची सुविधा फक्त वातानुकूलित डब्ब्यांमध्येच दिली जाते, ज्याच शुल्क तिकीटामध्येच घेतलेलं असतं. या सेवेच्या माध्यमातून प्रवासी आता 2 चादर आणि 1 उशी 140 रुपयांना तर ब्लँकेट 110 रुपयांमध्ये घेऊ शकतील.

 

रेल्वेकडून लवकरच वॉटर वेंडिंग मशिन्स लावली जाणार आहेत. यात आरओ प्युरीफाईड पाणी स्वस्त दरात प्रवाशांना मिळणार आहे. यात 300 मिली पाणी 1 रुपया तर 20 लीटर पाणी 20 रुपयांमध्ये मिळेल. पाणी ग्लास किंवा बाटलीमध्ये हवे असल्यास त्यासाठी एक रुपया जास्त द्यावा लागेल.