Railway Ticket Reservation : रेल्वे प्रवासासाठी मोबाइल अॅप अथवा संकेतस्थळावरून तिकिट आरक्षित (Railway ticket reservation) करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (PRS) दररोज सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वेचे तिकिट दर आणि रेल्वे क्रमांक अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवस PRS यंत्रणा बंद असणार आहे. 


'या' सात दिवसांच्या रात्री बुकिंग बंद


भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा रात्री 23.30 वाजल्यापासून ते सकाळी 5.30 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ही तांत्रिक प्रक्रिया आज रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. ही तांत्रिक बदल प्रक्रिया 20-21 नोव्हेंबर रात्रीपर्यंत सुरू असणार आहे. या कालावधीत तिकिट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे.


रेल्वेचे तिकिट दर पूर्ववत होणार


कोरोना महासाथीचा संसर्ग दर कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनचे संचालन बंद करण्याचा आणि नियमित ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकिट दरात दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात प्रवाशांना 30 टक्के अधिक तिकिट दर मोजावा लागत होता. 


स्पेशल ट्रेनऐवजी नेहमीची ट्रेन


कोरोना महासाथीच्या काळात सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन रद्द होऊन आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे एक्स्प्रेस ट्रेन असणार आहे. कोरोना महासाथीचा जोर ओसरल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. आता लांब पल्ल्याच्या ट्रेन पूर्वी प्रमाणे धावणार आहे. त्याशिवाय तिकिट दरही पूर्वीप्रमाणे असणार आहे. त्यामुळे कोरोना काळात प्रवाशांना असणारा अतिरिक्त दराचा भुर्दंड आता बसणार नाही. 


संबंधित वृत्त :


प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार धावणार, दरही पूर्ववत होणार