Odisha Train Accidnet: ओडिशाच्या बालासोरमध्ये एक्स्प्रेस ट्रेनला झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात आतापर्यंत 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 1,100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे, मात्र अजूनही बोगींमध्ये मृतदेह अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwin Vaishnaw) यांनी पत्रकार परिषद घेतली. रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू आहे, मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.






पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी देखील या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं. रेल्वे अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी ओडिशाच्या नागरिकांचे देखील यावेळी आभार मानले. बचावकार्यासाठी रेल्वेकडून युध्दपातळीवर करण्यात आल्याचं  पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं. 'ही घटना अनेक गोष्टी शिकवून गेली आहे, त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी प्रयत्न सरकारकडून करण्यात येतील' असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. 


विरोधकांचं टीकास्त्र


विरोधकांनी या घटनेवर टीका करत सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. तसेच या रेल्वेमध्ये कवच या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला नव्हता. तसेच या रेल्वेमध्ये अपघात थांबवणारी प्रणालीच नव्हती, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर या मार्गावर कवच ही प्रणाली उपलब्ध नव्हती, असे भारतीय रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले. 


पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे नेतृत्व करणारे सुधांशू मणी यांनी या दुर्घटनेत सहभागी असलेल्या दोन लोको पायलटची कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं. फेब्रुवारीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये दोन मालगांड्यांमध्ये झालेल्या अपघातावेळी रेल्वेने लोको पायलटवर कारवाई केली होती. 


हेही वाचा:


Train Accident: 'हा' आहे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात! रेल्वेचा डबा नदीत उलटून गेला होता 800 जणांचा जीव