आता रेल्वेच्या पासवर शॉपिंग करता येणार
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 05:46 AM (IST)
मुंबई : तुमच्या रेल्वेच्या पासवर यापुढे तुम्हाला शॉपिंग करता येऊ शकेल. कारण रेल्वेच्या पासचं क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये रुपांतर करण्याची रेल्वेची योजना आहे. ‘रेल्वे पास काढा आणि शॉपिंग करा’ अशी भन्नाट संकल्पना रेल्वेने पुढे आणली आहे. यासंदर्भात देशातील 31 बँकांशी रेल्वेची बोलणी सुरु आहे. नव्या संकल्पनेनुसार गोल्ड, सिल्व्हर आणि प्लॅटिनम अशा तीन प्रकारची कार्ड प्रवाशांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. महिना, तीन महिने किंवा सहा महिने मुदतीच्या पासवर ही योजना लागू करण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यामुळे लवकरच शॉपिंगसाठी तुमचा रेल्वे पास पुरेसा असणार आहे. रेल्वेच्या या योजनेसाठी एचडीएफसी, आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह जवळपास 31 बँकांशी चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळते आहे.