चंदिगढ : 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर करणी सेनेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र गुरुग्राममध्ये करणीच्या गुंडांनी अक्षरशः कहर केला. शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांच्या स्कूलबसवर तुफान दगडफेक केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे.

गुरुग्राममधील जीडी गोयंका वर्ल्ड शाळेतील मुलं बुधवारी संध्याकाळी घरी येत होती. त्यावेळी अचानक करणी सेनेच्या 60 गुंडांनी स्कूलबसचालकाला बस थांबवायला सांगितलं. ड्रायव्हरने दुर्लक्ष करत गाडी सुरुच ठेवल्याने गुंडांनी दगडफेक सुरु केली. बसच्या काचा फुटल्या, मात्र शिक्षकांनी बस पुढेच जाऊ देण्याचं ड्रायव्हरला बजावलं.

या हल्ल्यामुळे भेदरलेली 10 वर्षाच्या आतली मुलं स्कूलबसमधील शिक्षकांच्या मागे लपली. काही चिमुरड्यांना तर घाबरुन रडू फुटलं. दगडाच्या भीतीनं अखेर ही मुलं सीटच्या खालच्या जागेत लपून राहिली.

अतिशय संतापजनक असलेली ही दृश्यं व्हायरल झाल्यानंतर देशभरातून करणी सेनेच्या भ्याडपणावर जोरदार टीका होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अद्यापही कुणालाही अटक झालेली नाही.

लहान मुलांवरील हल्ल्याचं समर्थन करण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं ठरु शकत नाही. हिंसा आणि तिरस्कार ही दुर्बलांची हत्यारं आहेत. भाजपाकडून या हत्यारांचा होणारा वापर देशात आग पेटवत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

करणी सेनेची राडेबाजी भाजप सरकारच्या आशीर्वादानं सुरु आहे की काय असा संशय आता येऊ लागलाय. कारण देशभरात जिथं जिथं भाजपचं राज्य आहे, तिथं तिथं पद्मावत चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी तोडफोड आणि जाळपोळ सुरु आहे.