मुंबई : वर्षातला पहिला लाँग वीकेंड तोंडावर आल्यामुळे अनेकांनी बॅगा भरायला सुरुवात केली आहे. तुम्ही जर गोव्यात सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल आणि वेळ वाचवण्यासाठी विमानाची तिकीटं बुक करायच्या तयारीत असाल, तर आधी जरा खिसे चाचपडून पाहा. मुंबई-गोव्याचं परतीचं विमान तिकीट तब्बल 26 हजार रुपयांवर पोहचलं आहे.


तुम्ही जर आतापर्यंत विमान तिकीट बुक केलं नसेल, तर येत्या लाँग वीकेंडचं प्लानिंग तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारीची सुट्टी आणि शनिवार-रविवार असा लागून तीन दिवसांचा लाँग वीकेंड आला आहे.
मात्र या दिवसात गोव्याला जाणं तुमच्या खिशाला चाट लावू शकतं.

26 जानेवारीला मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणि 28 जानेवारीला परतण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत आहे 26 हजार रुपये. विशेष म्हणजे या विमानांच्या वेळाही अडनिड्या आहेत, म्हणजेच फारशा सोयीस्कर नाहीत. त्यासाठी जाताना तुम्हाला रात्री दहा वाजताचं विमान पकडावं लागेल, तर परतण्यासाठी गोव्याहून भल्या पहाटे 4 वाजता निघावं लागेल.

मुंबई-जोधपूर नॉनस्टॉप फ्लाईटचं विमान तिकीट उपलब्ध नाही. तर मुंबईहून पोर्ट ब्लेअरच्या नॉनस्टॉप फ्लाईटचं रिटर्न तिकीट तुम्हाला 42 हजारांना पडेल. मुंबईहून देहरादूनला विमानाने जाऊन येण्यासाठी तुम्हाला 32 हजार रुपये मोजावे लागतील. त्या तुलनेत मुंबई-दुबई रिटर्न तिकीट्स फक्त 22 हजारांपासून सुरु होत आहेत. त्यातही रात्री उशिरा किंवा पहाटे फ्लाईट पकडण्याची तुमची तयारी असल्यास अवघ्या 13 हजारात काम भागू शकतं.

गेल्या आठवड्यात अनेक विमान कंपन्यांनी स्वस्त विमान प्रवासाच्या ऑफर दिल्या होत्या. मात्र लाँग वीकेंडचं बुकिंग करताना खिशाला कात्री लागण्याचीच चिन्हं आहेत.