नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्यासाठी एका विद्यार्थ्याने पुढाकार घेतला आहे. देशभरात 27 निवडणुकांमध्ये पराभवांचा सामना करावा लागल्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांना गेल्या काही वर्षांत राजकीय कारकीर्दीत कठीण काळाला सामोरं जावं लागलं आहे. देशभरात काँग्रेसचे सलग पराभव झाल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. मध्य प्रदेशच्या होशंगबादमधील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या विशाल दिवाणने 'गिनीज बुक'कडे यासंदर्भात मागणी केली आहे.
पाच वर्षांच्या कालावधीत काँग्रेस पक्षाचे 27 वेळा पराभव झाले आहेत. राहुल गांधींच्या सक्रिय सहभागामुळेच पक्षाची हार झाल्याचं दिवाणचं म्हणणं आहे. विशालने गिनीज बुक प्रशासनाकडे याबाबत लेखी मागणी केली आहे. त्याचा अर्ज प्राप्त झाल्याचं पत्र मिळालं
असलं तरी ही मागणी मान्य होणार का नाही, याबाबत अद्याप उत्तर आलेलं नाही.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपला सत्ता मिळाली, तर फक्त पंजाबमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करुनही काँग्रेसला मोठा दणका बसला. त्यानंतर सोशल मीडियावरही काँग्रेसला टीकेचा सामना करावा लागला.